दिवळे ग्रामपंचायतीकडून पंधरावा वित्त आयोग निधीतुन शेतकरी अभ्यास दौऱ्याचे यशस्वी आयोजन ! महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
दिवळे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील ग्रामपंचायत दिवळे येथे पंधरावा वित्त आयोगाच्या निधीतून शेतकऱ्यांसाठी दापोली कृषी विद्यापीठ येथे अभ्यास दौऱ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते, या दौऱ्यात गावातील सर्व महिलांनी अतिशय उत्सुकतेने आणि उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता, ज्यामुळे कार्यक्रमात विशेष चांगली कामगिरी झाली आहे.
दिवळे गावच्या ग्रामस्थांनी आयोजकांचे कौतुक केले असून भविष्यात असे अधिक कार्यक्रम अपेक्षित असल्याचे सांगितले. या दौऱ्याने ग्रामपंचायतीच्या ग्रामीण सक्षमीकरणाच्या मोहिमेला नवीन दिशा मिळाली आहे.
प्रभारी सरपंच निलेश जगन्नाथ पांगारे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास अधिकारी एम.पी. सपकाळे, सदस्य निलेश चंद्रकांत पांगारे, निकिता अमोल पांगारे, प्राजक्ता सुनील पांगारे, वेणूताई पांडुरंग भोसले आणि संगणक परिचालक उज्वला नितीन पांगारे यांच्या सहकार्याने हे आयोजन अत्यंत यशस्वी झाले आहे.
प्रभारी सरपंच निलेश पांगारे म्हणाले, महिलांचा सहभाग हा कार्यक्रमाचा मुख्य आधार होता. अशा दौऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल आणि गावाचा सर्वांगीण विकास होईल.
ग्रामपंचायतीच्या या विशेष प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळाली असुन या शेतकरी अभ्यास दौऱ्यामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळणार असल्याचे ग्रामस्थ बोलत होते.




