मयुर खुंटे आत्महत्या प्रकरण ! कुटुंबीय व आंबेडकरी संघटनाचा ४८ तास संघर्ष !! अखेर पोलीस उपनिरिक्षक अनिल चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल
भोर : भोर शहरातील मयूर खुंटे (वय १९) या तरुणाने पोलिसांच्या अमानुष मारहाण झाल्याने घाबरून गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसह कुटुंबीयांनी तब्बल ४८ तास संघर्ष करून भोर पोलिसांच्या वरिष्ठांच्या दबावाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, संदीप सुतार व स्वप्नाली सुतार यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यास भाग पाडले.
मंगळवार (दि. २५) रोजी बोलावलेल्या चौकशीदरम्यान पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण यांच्याद्वारे मयूर खुंटे याला अंगावर आणि डोक्यावर काठी, पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आली होती,या अमानुष वागणुकीमुळे भितीग्रस्त झालेला मयूर त्या रात्री घरी परतला परंतु त्याने दुसऱ्या दिवशी वडील कामावर गेले असताना पोलिसांच्या भीतीमुळे घराच्या स्लॅबवरील हुकाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेनंतर मयूरचे कुटुंबीय तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व नातेवाईकानी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत ठिय्या आंदोलनासह रस्ता रोको आंदोलन केले होते, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंग गौर यांच्या संध्याकाळी हस्तक्षेपानंतर पोलिस उपनिरीक्षक अनिल चव्हाण यांना पिंपरी-चिंचवड मुख्यालयात बदली करण्यात आली होती.
ससून रुग्णालयात शवविच्छेदनाच्या वेळी मयूरच्या खिश्यात सुसाइड नोट सापडली. त्यामध्ये पोलिसांच्या गैरवर्तनामुळे आत्महत्या करण्यात आली असल्याचे स्पष्टपणे त्याने उल्लेख केला आहे,या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या दृष्टीने योग्य सूचना दिल्या आहेत. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंग गौर यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.
भोरच्या तरुणाची आत्महत्या व पोलिसांच्या क्रूरतेविरोधातील आंबेडकरी समाजाचा ठिय्या आंदोलन हा केवळ एका प्रकरणावरील आंदोलन न राहता, सामाजिक न्याय व पोलिसांच्या जबाबदारीच्या संदर्भातील एक महत्त्वाचा प्रश्न उभा करत आहे.या घटनेमुळे पोलिस प्रशासनावरील विश्वास आणि सामाजिक समरसतेला धक्का लागल्याचे दिसून येते. लोकांनी पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनाविरुद्ध आवाज उठविणे आणि न्याय मिळविणे महत्त्वाचे आहे.




