भोर नगरपालिका निवडणुकीत सोशल मीडियाचा दबदबा ! उमेदवारांचा डिजिटल माध्यमातुन प्रभावी प्रचार
भोर : भोर नगरपालिकेची निवडणूक सोशल मीडियाच्या जोरावर नवीन रूप घेतेय, यंदाचा प्रचार पूर्ण डिजिटल माध्यमातून होत असून उमेदवार थेट मतदारांच्या मोबाइलवर पोहोचण्यावर भर देत आहेत. व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स (ट्विटर) यांसारख्या सोशल प्लॅट फॉर्मवरून प्रचाराचा जोर वाढला असून, भोरमधील निवडणूक उत्साहाला डिजिटल रंग मिळाला आहे.
पूर्वीच्या काळी पोस्टरबाजी, भोंगे, भिंतींवर रंगकाम आणि मेळावे या पारंपरिक माध्यमांवर प्रचार अवलंबला जात असे मात्र आज डिजिटल क्रांतीमुळे खर्च, वेळ व मनुष्यबळ वाचले असून कमी खर्चात आणि जलद जनसंपर्क साधता येत आहे. इंस्टाग्राम रील्स, व्हिडिओ मेसेज, व्हाट्सअप, फेसबुक लाईव्ह, स्टेटस, जिंगल्स आपल्या गाव-शहरात प्रचाराचे प्रभावी साधन ठरत आहेत.
मतदारही आता सभा-मोर्च्यांवर नव्हे तर उमेदवारांच्या डिजिटल रेकॉर्ड, कामगिरी आणि सोशल प्रोफाइल पाहून निर्णय घेत आहेत. सोशल मीडिया निवडणुकीतील निर्णायक रणांगण बनला असून ज्याच्याकडे डिजिटल कौशल्य आणि आकर्षक संवाद क्षमता असेल तोच आजच्या राजकारणात पुढे दिसणार आहे. भोरमधील निवडणूक ही आता भिंतीवर नाही, तर मोबाइलस्क्रीनवर झालेली लढत आहे.




