भोर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष जीवन सोनवणे यांच्याकडून भांबवडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस सीसीटीव्ही कॅमेरे भेट
सारोळे : तालुक्यातील भांबवडे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सुरक्षेच्या दृष्टीने मोठी मदत मिळाली आहे. भोर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष व गावचेच सुपुत्र जीवन सोनवणे यांनी सामाजिक बांधिलकी जपत शाळेला दोन आधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट दिली. ग्रामीण भागातील शाळांमध्ये सुरक्षितता, शिस्तबद्धता व मुलांच्या संरक्षणासाठी अशा सुविधा अत्यंत महत्त्वाच्या ठरत असताना हा उपक्रम भावनिक व सामाजिक नाळ जपणारा ठरला आहे.
शाळेच्या परिसरात व इमारतीत बसविण्यात आलेले हे कॅमेरे विद्यार्थ्यांच्या हालचाली, सुरक्षेची काळजी आणि शाळेतील वातावरणावर सातत्याने लक्ष ठेवू शकणार आहेत. शिक्षक व पालकांनी या उपक्रमाचे स्वागत करत सोनवणे यांचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी जीवन सोनवणे यांनी बोलताना सांगितले की, “आगामी काळात ‘माझं गाव, माझा अभिमान’ या संकल्पनेतून संपूर्ण गावात सीसीटीव्ही कॅमेरे आणि पब्लिक अॅड्रेस स्पीकर सिस्टम बसविण्याचा संकल्प केला आहे. सुरक्षित गाव, सतर्क गाव आणि सुसंस्कृत गाव ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी हा छोटा प्रयत्न आहे.”
कार्यक्रमाला सरपंच माधवीताई सोनवणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष सोनवणे, उपाध्यक्षा आशा पवार, शिक्षिका निवेदिता फडणवीस, ग्रामसेवक महादेव सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी शाळेच्या उभारणीत समाजातील व्यक्तींनी पुढाकार घेणे ही सकारात्मक बाब असल्याचे सांगितले.
भांबवडे गावात यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रम जीवन सोनवणे यांच्याकडून राबवले गेले असून, ग्रामीण भागाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी अशा कृतींची आवश्यकता असल्याचे स्थानिकांनी व्यक्त केले. मुलांच्या सुरक्षा आणि शैक्षणिक वातावरण सुधारण्यासाठी गावातील तरुण नेतृत्व पुढे येत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
या उपक्रमामुळे भांबवडे शाळेच्या कार्यात एक नवी सुरक्षितता पातळी प्राप्त झाली असून, येत्या काळात गावात होणाऱ्या सीसीटीव्ही व स्पीकर प्रकल्पामुळे भांबवडे ‘सुरक्षित व प्रगत गाव’ बनण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणार आहे.




