भोर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार ! दोनजणांवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल व अटक
नसरापूर : भोर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर दोन नराधमानी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असुन यात पीडित मुलगी सात महिन्याची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले आहे, या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी महेश अरुण रसाळ आणि राज सुनील तिखोळे अशा दोन जणांना अटक केली आहे. यातील आरोपी महेश याने ट्रॅक्टर शिकविण्याच्या बहाण्याने शेतातच पीडितीवर वारंवार बलात्कार केला असून दुसरा आरोपी राज याने गावामध्ये, कधी मोटारीमध्ये, आणि कधी तिच्याच घरात शिरून पीडितेवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या दोघांनी मिळुन नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या काळात पीडित मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी जबरदस्तीने अत्याचार केला आहे.
दरम्यान, या अल्पवयीन मुलीस तब्येतीचा त्रास होवु लागल्याने तिच्या नातेवाईकांनी तीला रुग्णालयात दाखल केले असता ती सात महिन्यांची गरोदर असल्या संदर्भातील माहिती रुग्णालय प्रशासनाने सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून या घटनेबाबतचा अधिकचा तपास राजगड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी करत आहेत.