पिंपरी-चिंचवडचे कारभारी बदला : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ! मोबाईल व्हिडिओ कॉलींगद्वारे शहरवासीयांना आवाहन
पिंपरी : महापालिकेतील भ्रष्टाचार, निविदेतील रिंग, रस्ते गैरप्रकार, कुत्र्यांच्या नसबंदी घोटाळे, डांबरीवर सिमेंट टाकणे, लाच प्रकरणात स्थायी समिती अध्यक्षाची अटक, कोयता गँगचा हैदोस अशा प्रकारांनी पिंपरी-चिंचवड झपाट्याला लागले आहे. सत्ताधाऱ्यांवर बोलणार नाही, पण सुधारणेसाठी कारभारी बदलावेत, असे सडेतोड आवाहन शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोबाईल व्हिडिओ कॉलींगद्वारे शहरवासीयांना केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी किवळेतील मुकाई चौकात सभा झाली. शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या प्रगतीला गती देणारे हे शहर आहे. शिवसेना विकास अजेंड्यासह लढतेय. इतिहास तडजोड न करणाऱ्यांचाच लिहितो. घाबरू नका, बिनधास्त लढा. गेल्या तीन वर्षांत माझ्यावर टीका-शिव्या झाल्या, संयम ठेवा. सत्याला त्रास होतो, पण पराभव होत नाही.
शिवसेना स्वबळावर लढते, हलक्यात घेऊ नका.विकासनिधीची खात्री : शहरासाठी मोठा निधी दिला. सांडपाणी निचऱ्यासाठी ५२ कोटी, पाणीपुरवठ्यासाठी १५३ कोटींची योजना मंजूर. पवना जलवाहिनी, पवना-मुळा-इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन, अर्धवट डीपी रस्ते पूर्ण, वाकड-हिंजवडी वाहतूककोंडी दूर, चापेकर स्मारकासाठी ६८ कोटींचा आराखडा व १३ कोटी वर्ग. अनधिकृत बांधकाम सुटवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, उपनेते इरफान सय्यद, सुलभा उबाळे, शुभांगी बोऱ्हाडे, महानगरप्रमुख राजेश वाबळे, जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विश्वजीत बारणे, जिल्हा संघटक बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख निलेश तरस, जिल्हा संघटिका शिला भोंडवे, रुपेश कदम, सायली साळवे, माऊली जगताप यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते.




