ताज्या घडामोडी

वेल्हे बुद्रुक ग्रामपंचायतीत धक्कादायक कारवाई ! १५ व्या वित्त आयोग निधीचा गैर वापर !! दोन माजी सरपंचासह एका माजी उपसरपंचाचा समावेश


वेल्हे : राजगड तालुक्यातील वेल्हे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या तिघा प्रमुख सदस्यांना कर्तव्यात कसूर आणि हलगर्जीपणाच्या गंभीर आरोपांखाली महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९(१) अंतर्गत उर्वरित कालावधीसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मंगळवार (ता. ९) रोजी सुनावणीनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय सुनावला. या कारवाईमुळे राजगड तालुक्यात खळबळ उडाली असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

अपात्र ठरलेल्यांमध्ये माजी सरपंच व विद्यमान सदस्य संदीप केशवराव नगीने, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य निखिल चंद्रकांत गायकवाड आणि माजी सरपंच व विद्यमान सदस्य मेघराज दत्तात्रेय सोनवणे यांचा समावेश आहे. या प्रकरणाची सुरुवात ग्रामस्थ शंकरराव बबनराव चाळेकर, प्रमोद विठ्ठल भोरेकर व गणेश तानाजी निकम यांच्या तक्रारीने झाली. तक्रार गटविकास अधिकाऱ्यांकडे दाखल झाली असता, प्राथमिक चौकशीत पदाधिकाऱ्यांच्या कामकाजातील अनियमितता उघड झाल्या. यानंतर अहवाल मुख्य कार्यकारी अधिकऱ्यांकडून विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला.चौकशीत तब्बल १३ गंभीर मुद्दे समोर आले.

Advertisement

१५ व्या वित्त आयोग निधीचा बेकायदेशीर वापर, देवस्थान ट्रस्टची मान्यता न घेता आरो फिल्टर शेड उभारणे, चुकीचे मिळकत उतारे दाखवून वीज कनेक्शन घेणे, वस्तू खरेदी प्रक्रियेत नियमभंग, वाहतूक लिलावातील त्रुटी, सर्व खरेद्यांना एकाच ठरावात मंजुरी आणि आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर शेरे आकारणे अशा प्रकारांचा उल्लेख आहे. अंतरिम गटविकास अधिकाऱ्यांचा व मुख्य कार्यकारी अधिकऱ्यांचा अहवाल आधारे विभागीय आयुक्तांनी तिन्ही सदस्यांना अपात्र घोषित केले आहे.

या निर्णयामुळे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारावर लगाम घातल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. राजगड तालुक्यात ही कारवाई चर्चेचा विषय ठरली असून, पारदर्शक कारभाराची अपेक्षा वाढली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!