वेळू-नसरापूर गटातून माऊली चव्हाण यांची जिल्हा परिषदेसाठी उमेदवारीची तयारी
नसरापूर : वेळू-नसरापूर जिल्हा परिषद गटातून निवडणुकीत माऊली सुभाष चव्हाण यांनी उमेदवारी दाखल करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. समाजातील सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून त्यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून सतत समाजकार्यात सक्रिय सहभाग ठेवला असून, छोट्या-मोठ्या उपक्रमांतून त्यांनी नेहमीच लोकसहभागाला प्रोत्साहन दिले आहे.
वेळू-नसरापूर गट हा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने माऊली चव्हाण यांना या जागेवरून लढण्याची संधी मिळत आहे. स्वतः ओबीसी समाजातील सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे त्यांना या प्रभागातील सर्व घटकांचा पाठिंबा लाभत आहे. नसरापूर बाजारपेठेतील रहिवासी आणि व्यावसायिक म्हणून त्यांनी पंचक्रोशीतील नागरिकांशी मनोमन संबंध प्रस्थापित केले आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून समाजजीवनात सक्रीय असलेल्या माऊली चव्हाण यांना गावकऱ्यांचा भरभरून पाठिंबा मिळत आहे.
आपल्या गावातीलच उमेदवार असावा अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे. त्यांच्या आई ज्योती सुभाष चव्हाण या नसरापूर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच राहिल्या असल्यामुळे चव्हाण कुटुंबाचा समाजकार्यातील वारसा आणि अनुभव उमेदवारीस बळकट पाठबळ देणारा घटक मानला जात आहे.
गावातील युवक, महिलावर्ग तसेच ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या उमेदवारीबाबत उत्साह व्यक्त केला आहे. “एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून उभा राहावा” अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
माऊली चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीत वेळू नसरापूर गटात चुरस वाढण्याची चिन्हे दिसत असून त्यांच्या प्रचाराची सुरूवात स्थानिक पातळीवर जोमात सुरू आहे.




