भोर नगरपालिका निवडणुकीत एकुण ७६.९९% मतदान ! शांततेत मतदान पण आजी-माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव
भोर : भोर नगरपालिकेच्या २२ मतदान केंद्रांवर ७६.९९% टक्के मतदान झाले असून सकाळी ७.३० ते संध्या ५.३० पर्यंत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. शहरातील १६,७१६ मतदारांपैकी १२,८७० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजानन शिंदे यांनी दिली.
भोरमधील मतदान केंद्रांवर थंडी असूनही सकाळ पासूनच मोठी गर्दी होती.मतदान केंद्रांवर कोणताही गोंधळ किंवा मतमंथन न होता, अत्यंत शिस्तीत मतदान पार पडले. वयोवृद्ध आणि अपंग मतदारांसाठी व्हीलचेअर सुविधा आणि निवडणूक आयोगाकडून खास सोयीची तरतूद करण्यात आली होती. त्याचबरोबर उमेदवारांकडून मतदारांना खासगी रिक्षा, कार, टू-व्हीलरने मतदान केंद्रांपर्यंत नेण्याची व्यवस्था करण्यात आली होती.एकंदरीत, मतदान केंद्रांवर मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला,
एका मतदान केंद्रांवर आजी-माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु भोर पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्त ठेवला. बाहेरगावी जाणाऱ्या मतदारांनीही मतदानाचा मोठ्या प्रमाणावर मतदान केंद्रांवर गर्दी केली होती,पण सर्वत्र शांतता राखण्यात पोलीस प्रशासनास यश आले.
मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे भोर शहरातील अनेक प्रभागांत चुरशीची लढत सुरू होण्याची शक्यता वाढली आहे. काही भागांमध्ये वाढलेल्या मतदानामुळे अनपेक्षित उलटफेर होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळांमध्ये रंगत आहे. निवडणूक संपल्यावर विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपपल्या विजयाचा दावा जोरदारपणे केला असून, भोरकरांना निकालासाठी २१ डिसेंबर पर्यंत वाट पाहवी लागणार आहे.




