पुणे जिल्हा बँकेत लिपिकांच्या 434 जागा ! अर्ज प्रक्रिया 1 डिसेंबर पासून सुरु
पुणे : बँकिंग क्षेत्रात स्थिर आणि आकर्षक करिअर शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदासाठी तब्बल 434 जागांची भरती लवकरच होणार आहे. या भरतीमुळे पुणे आणि आसपासच्या भागातील उमेदवारांसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
संचालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 1 डिसेंबर 2025 रोजी सुरू होईल. अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 20 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. संपूर्ण अर्ज प्रक्रिया आणि शुल्क भरणा ऑनलाईन पद्धतीनेच होईल. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ www.pdccbank.in येथे जाऊन अर्ज करावा.
बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑनलाईन परीक्षेची तारीख तसेच प्रवेशपत्र डाउनलोड करण्याच्या आणि मुलाखतींच्या तारखा पुढील काळात संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्या जातील. उमेदवारांनी अद्ययावत माहितीसाठी संकेतस्थळ नियमितपणे तपासण्याचे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे
.या भरती प्रक्रियेत 70 टक्के जागा पुणे जिल्ह्यातील रहिवाशांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. उर्वरित 30 टक्के जागा जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी असतील. तथापि, बाहेरील उमेदवारांकडून पुरेसे पात्र अर्ज प्राप्त न झाल्यास ती पदे पुणे जिल्ह्यातील पात्र उमेदवारांमधून भरली जाणार आहेत.
सदर पदांसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटींची सविस्तर माहिती बँकेच्या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध होईल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रांची तयारी आत्तापासूनच ठेवणे योग्य ठरेल.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ही मेगा भरती स्थानिक तरुणांसाठी रोजगाराचा मोठा मार्ग उघडणार आहे. स्थिर नोकरी, आकर्षक वेतनश्रेणी आणि बँकिंग क्षेत्रातील प्रगतीशील वातावरण यामुळे ही भरती अनेकांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते.




