भोर तालुक्यात ‘आपले सरकार सेवा’ व ‘आधार केंद्र’ संचालकांचा तीन दिवसीय संप ! शासनाच्या धोरणांचा केला निषेध
भोर : दि. 12 नोव्हेंबर (गुरुवार) महाराष्ट्र शासनाकडून होत असलेल्या सापत्न वागणुकी विरोधात राज्यभरातील महा ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संचालकांनी एकत्र येत 12 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत तीनदिवसीय संप पुकारला आहे. या आंदोलनाला भोर तालुक्यातील सर्व सेवा केंद्र संचालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपापली केंद्रे बंद ठेवली असून, शासनाच्या दुर्लक्षी भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
‘आपले सरकार सेवा केंद्र’ हे 2010 पासून ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजना व सेवा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे. हे केंद्र शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा ठरलेले असून, संचालक अनेक वर्षांपासून तत्परतेने कार्यरत आहेत. मात्र, शासनाकडून होणारा दुर्लक्ष, तांत्रिक अडचणी आणि केंद्र वाटपातील गैरव्यवहार यामुळे या संचालकांच्या उपजिविकेवर गदा आली आहे.
संपात सहभागी असणारे भोर तालुका संघटनेचे अध्यक्ष सतीश थोपटे यांनी सांगितले की, “नवीन केंद्र वाटप करताना जुन्या केंद्र संचालकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होत आहे. जिथे गरज आहे तिथेच नवीन केंद्र मंजूर करण्यात यावीत. शासनाकडून दिले जाणारे कमिशन अल्प असून ते वेळेवर मिळत नाही.
महाऑनलाइन पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते.”
थोपटे यांनी पुढे सांगितले की, “एका गावात चार-चार केंद्र मंजूर करून शासन जुने केंद्र बंद होण्याच्या मार्गावर नेत आहे. त्यामुळे शासनाने मजूर सहकारी संस्थांप्रमाणे सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या रोजगारावर कुऱ्हाड चालवू नये. केंद्र संचालकांचा हक्काचा रोजगार वाचविण्यासाठी शासनाने तात्काळ सकारात्मक भूमिका घ्यावी.”भोर तालुक्यात या आंदोलनात मोठ्या संख्येने केंद्र संचालक सहभागी झाले.
यामध्ये उपाध्यक्ष श्रीकांत खुडे, सचिव विकास गाडे, खजिनदार विक्रम मालुसरे, कार्याध्यक्ष मिलिंद शिरगावकर, सहकार्याध्यक्ष विनोद राऊत, विशेष सल्लागार निशिगंध कांबळे तसेच योगेश किंद्रे, गणेश खुडे, रामदास लेकावळे, महेश किंद्रे, गणेश बहिरट, अनिल मैंद, धनंजय आवळे, आदित्य माने, प्रकाश बांदल आणि सुधीर गोरड आदी सदस्य उपस्थित होते.
संपा दरम्यान सर्व केंद्र बंद राहिल्याने नागरिकांच्या कामांवर परिणाम झाला असला, तरी संचालकांनी जनतेची गैरसोय झाल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.




