वेळू पंचायत समिती गणातून रोहिदास आबा कोंडे मैदानात ! निष्ठा, संघर्ष आणि शिवसैनिकत्वाचा अभिमान पुन्हा उजाळला
वेळू : स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर तालुक्यातील वेळू गणातील राजकीय समीकरणांना नव्या दिशा मिळू लागल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले रोहिदास आबा कोंडे यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरल्याची घोषणा करताच स्थानिक पातळीवर उत्साहाची लाट पसरली आहे.
शिवगंगा खोरे हे शिवकालीन परंपरेला वाटचाल करणारे आणि शिवसैनिकत्वाचा आत्मा जपणारे क्षेत्र मानले जाते. या भूमीतून घडलेले रोहिदास आबा कोंडे गेली अनेक वर्षे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास ठेवत पक्षाशी अत्यंत निष्ठेने जोडलेले आहेत. संकटाच्या काळातही त्यांनी विचलित न होता पक्षाची पताका उंच ठेवली. “शिवसेना आमची ओळख आणि कार्यकर्ताच आमचा खरा उमेदवार,” असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
दोन दशकांहून अधिक काळ कोंडे यांनी स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी असोत, युवकांसाठी रोजगाराची मागणी असो किंवा कार्यकर्त्यांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवायचा असो ते नेहमी अग्रस्थानी राहिले. आंदोलन, उपोषणे आणि संघटीत लढ्यांत त्यांनी सातत्याने सहभाग नोंदवला. त्यामुळे ते संघर्षशील व कार्यकर्तामुखी नेते म्हणून ग्रामीण भागात आदराचे स्थान मिळवून बसले आहेत.
तसेच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी शिवभूमी संघटनेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक तसेच आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले. विशेषतः कोविड काळात त्यांनी अन्नधान्य व औषधसाहित्य पुरवून शेकडो कुटुंबांना आधार दिला. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत व आरोग्य तपासणी शिबिरांमुळे जनमानसात त्यांची प्रतिमा सेवाभावी नेत्याची बनली आहे.
स्थानिक नागरिकांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास असून ग्रामस्थांमध्ये म्हण प्रचलित आहे, “आबा बोलतात कमी, पण काम करतात जास्त.” त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच मागणी पुन्हा बळावली आहे: “निष्ठावान स्थानिक कार्यकर्त्यालाच उमेदवारी मिळावी, आयात उमेदवारांना नाही.”रोहिदास आबा कोंडे यांच्या निष्ठा, संघर्ष, सामाजिक योगदान व कार्यकर्त्यांशी असलेल्या सखोल नात्यामुळे वेळू गणातील उमेदवारीच्या चर्चांना नवचैतन्य आले आहे. त्यांच्या पुढाकाराने शिवगंगा खोऱ्याच्या विकासाला नवा वेग आणि शिवसैनिकत्वाला नवा आत्मविश्वास मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक जनतेतून व्यक्त होत आहे.




