भोर तालुक्यातील निर्भीड पत्रकार वैभव धाडवे पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश ! कामथडी-भोंगवली गटातून उमेदवारी जाहीर
भोर : भोर तालुक्यातील निर्भीड पत्रकार म्हणून ओळख असलेले वैभव धाडवे पाटील यांनी विचारधारेच्या आधारावर काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सत्ता, पद आणि प्रतिष्ठेच्या मागे न धावता लोकांच्या बाजूने उभे राहत त्यांनी हा निर्णय घेतला. अन्यायाविरोधात नेहमी आवाज उठवणारे धाडवे पाटील यांनी पत्रकारितेतून सामान्य माणसाच्या वेदना, प्रश्नांना वाचा फोडली. कधीही दबाव किंवा तडजोड न स्वीकारता आता ते ‘लोकांसाठी राजकारण’ करणार आहेत.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये प्रवेश केला असला तरी वैचारिक भूमिकेमुळे त्यांनी काँग्रेसची वाट निवडली. आजच्या सत्ताभोवती फिरणाऱ्या राजकारणात त्यांनी सिद्ध केले की राजकारण हे लोकांवर राज्य नसून, त्यांच्यासाठी काम करण्याचे साधन आहे.
भीती, सौदेबाजी नाकारून लोकांची साथ आणि विचारधारेची ताकद हे त्यांचे भांडवल आहे.या ऐतिहासिक प्रसंगी भोर तालुका काँग्रेस अध्यक्ष सतीश चव्हाण, युवक काँग्रेस अध्यक्ष रोहन भोसले, पुणे जिल्हा युवक काँग्रेस प्रवक्ता सचिन खोपडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, आगामी कामथडी-भोंगवली जिल्हा परिषद निवडणुकीत धाडवे पाटील यांच्या काँग्रेसकडून उमेदवारीची घोषणा झाली. या निर्णयाने भोर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. काँग्रेसला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र आहे.




