भोर नगराध्यक्ष पदाचा पेच कायम ! भाजपात पवार-जगताप यांच्यात रंगतदार रस्सीखेच !! गणेश पवारांना जनसमर्थनाचा जोरदार पाठिंबा
भोर : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर शहरात राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर अद्यापही पेच कायम असून भाजपमधील गणेश पवार आणि संजय जगताप यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप या दोन पक्षांमध्येच प्रमुख लढत होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
भोर शहरात उमेदवारांच्या मुलाखतींमुळे दोन्ही पक्षांच्या कार्यालयांत मोठी लगबग दिसत आहे. माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले असून भाजपचे वर्चस्व वाढले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात अनेक कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाने पुन्हा ताकद एकवटली आहे. या पार्श्वभूमीवर तिकीट वाटप आणि प्रभागनिहाय रणनीती आखण्यासाठी दोन्ही पक्ष गेले काही दिवस चर्चेत आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी यंदा सर्वसाधारण आरक्षण लागू झाल्याने गणेश पवार यांचे नाव भाजपकडून सर्वाधिक चर्चेत आहे. त्यांचे सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक संबंध भोर शहरात बळकट असून त्यामुळे त्यांचे पारडे जड असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पवार घराण्याचा भोरच्या स्थानिक राजकारणात दीर्घ वारसा आहे.
दिवंगत शंकरतात्या पवार हे पंधरा वर्षे नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि गटनेते होते. गणेश पवार यांनी देखील मागील पंचवार्षिकेत नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष म्हणून काम करताना विकासकामांत नेतृत्व दाखविले.
त्यांच्या कारकिर्दीत शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज आणि पाइपलाइन अशा मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्या. विद्यार्थी कल्याण, आरोग्य शिबिरे, उत्सव काळातील सामाजिक उपक्रम अशा क्षेत्रात त्यांनी कार्य केले. शहरातील तरुण वर्ग आणि सर्वसामान्य जनतेत त्यांचा जनसंपर्क घट्ट असून, त्यांना व्यापक पाठिंबा मिळत आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामचंद्र आवारे यांचे नाव पुढे येत असल्याची चर्चा असून, हीच भाजपा-राष्ट्रवादी यांच्यातील थेट लढत ठरेल की काय, असा प्रश्न सध्या शहरात चर्चेचा विषय बनला आहे. सत्तास्थापनेसाठी भाजपच्या अंतर्गत गोटात गणेश पवार किंवा संजय जगताप यापैकी कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक जनतेच्या मनावरचा प्रभाव व अनुभवाच्या पार्श्वभूमीवर सध्या गणेश पवारांचे पारडे जड दिसत आहे.




