मोरवाडी येथे भक्तिभावात सुवर्ण कलशारोहन समारंभ व अखंड हरिनाम सप्ताहाचा २१ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा
किकवी : भोर तालुक्यातील मौजे मोरवाडी परिसरात अखंड हरिनाम सप्ताहाचा एकवीसावा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने रविवार, दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता होमहवन, यज्ञ, अभिषेक आणि महापूजेचे आयोजन करण्यात आले. दुपारी ३.३० वाजता ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुवर्ण कलशारोहन समारंभाचे आयोजन झाले.
कोल्हापूर येथील सद्गुरू काडसिद्धेश्वर स्वामी मठाधिपती यांच्या हस्ते विधिवत पूजन होऊन सुवर्ण कलशारोहन करण्यात आले. वातावरण भक्तिरसाने भारावून गेले होते. श्री गणेश विठ्ठल रूखमाई प्रासादिक भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळाने आयोजन अत्यंत सुंदररीत्या पार पाडले.
मारूती मंदिर व विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुवर्ण कलशारोहनामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरात हरिनाम सप्ताहानिमित्त सतत नामस्मरण व भजनांचा निनाद घुमत राहिला. अनेक भाविकांनी या प्रसंगी दर्शन घेत आशीर्वाद मिळवला. या धार्मिक सोहळ्यामुळे गावात अध्यात्मिक उर्जेची नवी चेतना पसरली असून, समाजात एकतेचा आणि भक्तिभावाचा संदेश देणारा हा अतुलनीय उपक्रम ठरला आहे. ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नाने हा ऐतिहासिक सुवर्ण कलशारोहन सोहळा संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्रामदादा थोपटे, स्वरूपाताई थोपटे, चंद्रकांतदादा बाठे, विक्रमदादा खुटवड, कुलदीप तात्या कोंडे, शलाका ताई कोंडे, रोहन दादा बाठे, गणेश तात्या निगडे, धनेश भाऊ डिंबळे आणि राजेंद्र मोरे यांची उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या उपस्थितीने समारंभाचे आकर्षण अधिक वाढले.




