कामथडी पंचायत समिती गणात महिला नेतृत्वाचे नवे पाऊल ! सोनम गोळे यांची प्रभावी उमेदवारी
संगमनेर : भोर तालुक्यातील न-हे गावच्या सोनम विजय गोळे या उच्चशिक्षित व समाजभान जपणाऱ्या तरुणीने आगामी पंचायत समिती निवडणुकीत कामथडी गणातून भाजप पक्षाकडून उमेदवारी व्यक्त केली आहे. शिक्षणाने D-Pharmacy पदवीधर असलेल्या सोनम गोळे यांना समाजकार्याची आवड असून, त्यांनी गेल्या काही वर्षांत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला आहे.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी युवाशक्तीचा प्रभावी वापर करणे ही त्यांची मुख्य भूमिका आहे.सोनम गोळे यांच्या पाठीशी त्यांचे पती विजय बबन गोळे यांचे मजबूत राजकीय पाठबळ आहे. विजय गोळे हे न-हे ग्रामपंचायतीचे मा. उपसरपंच असून त्यांनी तालुक्यातील राजकारणात संग्रामदादा थोपटे यांच्यासोबत सातत्याने काम केले आहे. गावातील विकासकामे, पायाभूत सुविधा आणि तरुणांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय ठरले आहेत.
सोनम गोळे यांच्या सासऱ्यांचे बबनराव गोळे यांचे नावही तालुक्यातील ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांपैकी घेतले जाते. ते सध्या भोर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती असून, गेली ३० वर्षे तालुक्यातील राजकारणात सक्रिय आहेत. भाटघर धरणग्रस्तांसाठी त्यांनी दीर्घकाळ लढा दिला आणि त्या आंदोलनात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
सोनम विजय गोळे यांची उमेदवारी स्थानिक सर्वसामान्यांमध्ये उत्सुकतेचा विषय बनली आहे. शिक्षण, तरुणाई, आणि सशक्त राजकीय पार्श्वभूमी यांच्या योग्य संगमातून त्या तालुक्याच्या विकासकार्यात एक नवी दिशा देऊ शकतात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.




