महानगरपालिका निवडणुका जाहीर ! २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान !! १६ जानेवारीला मत मोजणी
मुंबई : राज्यातील गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महानगरपालिका निवडणुकां अखेर बिगुल वाजले आहे, राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (१५ डिसेंबर २०२५) निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे, निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली असुन मुदत संपलेल्या २७ आणि नव्याने स्थापन झालेल्या २ अशा एकूण २९ महानगरपालिकांसाठी या निवडणुका होणार आहेत.
निवडणूक कार्यक्रमानुसार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होईल, तर १६ जानेवारीला मतमोजणी पार पडेल. आजपासूनच या २९ महापालिकांच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रचार मोहिमांना वेग येईल. घरोघरी भेटी सभा आणि जाहीर सभांचा सिलसिला सुरू होईल.
राज्यातील प्रमुख महानगरपालिका जसे मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, नाशिक यांचा यात समावेश आहे. गेल्या सात वर्षांत न्यायालयीन प्रक्रिया आणि आरक्षण मुद्द्यांमुळे निवडणुका रखडल्या होत्या. आता कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार राजकीय आखाडा रंगणार आहे.
निवडणुका पार पडल्यानंतर नव्या महानगरपालिका प्रशासनाला गती मिळेल. नागरी सुखसेवा, रस्ते, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनासारख्या मुद्द्यांवर उमेदवारांमध्ये स्पर्धा रंगणार आहे. राजकीय नेत्यांकडून उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात झाली असून उमेदवारांची यादी लवकरच स्पष्ट होईल.
पुढीलप्रमाणे असेल निवडणुक कार्यक्रम :-
•. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे
२३ डिसेंबर ते ३० डिसेंबर
•. अर्जाची छाननी ३१ डिसेंबर
•. उमेदवारी माघारीची मुदत – २ जानेवारी
•. चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी ३ जानेवारी
•. मतदान – १५ जानेवारी
•. निकाल – १६ जानेवारी




