शिरुर तालुक्यातील केंदूर गावाची यशोगाथा ! प्रत्येक सदस्याला सरपंचपदाची समान संधी !! पाच वर्षांत सर्व सदस्य सरपंच-उपसरपंच !!! राजकीय एकोप्याचा आदर्श
घनश्याम शेलार,
शिरुर.
शिरुर : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच-उपसरपंचपदासाठी नेहमीच चुरस आणि घोडेबाजार पाहायला मिळतो. गटबाजी वादविवाद आणि राजकीय खटके टाळण्यासाठी पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील केंदूर ग्रामपंचायतीने अनोखा पॅटर्न राबवला. असुन गेल्या पाच वर्षांत ग्रामपंचायतीतील सर्व १७ सदस्यांना सरपंच आणि उपसरपंचपदाची संधी मिळाली आहे.हा आदर्श निर्णय गावातील राजकीय एकोपा टिकवण्यासाठी घेण्यात आला असून शिरूर तालुक्यातील हे एकमेव गाव ठरले आहे.
केंदूर ग्रामपंचायत २५ जानेवारी २०२१ रोजी अस्तित्वात आली. तेव्हा पासून गावातील सर्वपक्षीय नेते आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन हा फॉर्म्युला तयार केला आहे, प्रत्येक सदस्याला सरपंच किंवा उपसरपंच म्हणून गावाचा कारभार हाताळण्याची संधी मिळावी यासाठी पाच वर्षांचा कालावधी विभागून ठेवण्यात आला. आहे यामुळे गावात राजकीय मतभेद टाळले जात आहेत आणि सर्वांना समान मान सन्मान मिळत आहे.
• सरपंचपदाची संधी मिळालेले आठ सदस्य १) सरपंचपदी सुवर्णा सतीश थिटे २) सुनील थिटे ३) अविनाश साकोरे ४) सूर्यकांत थिटे ५) अमोल थिटे ६) प्रमोद पहाड ७) मंगल साकोरे ८) अलका सुदाम पहाड यांना अनुक्रमे संधी देण्यात आली. हे सर्व सदस्य निवडून आलेल्या १७ पैकीच आहेत. प्रत्येकाने आपापल्या कालावधीत गावाच्या विकासकामांना गती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.या सर्वांनी रस्ते, पाणीपुरवठा, शाळा सुधारणा यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले होते.
• उपसरपंचपदी एकूण नऊ सदस्यांनी काम पाहिले त्यामध्ये
१) भरत साकोरे २) जयश्री सुक्रे (दिवंगत) ३) योगिता थिटे ४) विठ्ठल ताथवडे ५) ज्योती गावडे ६) शालन भोसुरे ७) मंगेश भालेकर ८) कल्पना थिटे ९) सुषमा पहाड यांना संधी मिळाली. जयश्री सुक्रे यांचे निधन झाले असले तरी त्यांनी त्यापदास न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. हा पॅटर्न राबवताना सदस्यांनी एकमेकांच्या योग्य निर्णयांना पाठिंबा देत होते, ज्यामुळे गावाचा विकास सातत्यपूर्ण राहिला आहे. केंदुर ग्रामपंचायत सदस्यांच्या या निर्णयाचे गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे. राजकारणात सक्रिय व्यक्तींनी एकोपा राखला असुन घोडेबाजाराऐवजी सर्वांना समान संधी दिल्या आहेत असे सरपंच अलका पहाड यांनी सांगितले.
केंदूर गावाचे १,५०० कुटुंब आणि ६,००० लोकसंख्या आहे. येथे शेतीप्रधान अर्थव्यवस्था असून पाण्याच्या प्रकल्पांसाठी हे पद सांभाळणाऱ्यांनी विशेष योगदान दिले, इतर सर्व सदस्यांचे मत आहे की हा पॅटर्न राज्यभर राबवावा त्यामुळे सर्वांना समान संधी मिळाल्याने प्रत्येक गावातील गावकऱ्यांचा विश्वास वाढेल, व गावात वाद कमी होतील असे उपसरपंच सुषमा पहाड यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी हा आदर्श ठरू शकतो. ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंदूरचे ही यशोगाथाचा सर्वांनी अवलंब करणे काळाची गरज आहे.




