सारोळा ते वीर रस्त्यासाठीचे उपोषण आश्वासनानंतर स्थगित ! रस्त्याची तातडीने डागडूजी करून नवीन रस्त्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पठवणार
सारोळा : भोर तालुक्यातील पुर्व भागातील सारोळा ते वीर रस्त्यांची दुरवस्था रस्त्या दुरुस्तीच्या दीर्घकाळ प्रतीक्षेत असल्याने व प्रशासनाने केलेले दुर्लक्ष या विरोधातपूर्व विभाग रस्ता विकास कृती समितीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. १९ सप्टेंबर (शुक्रवार) रोजी भोंगवली येथे आमरण उपोषण पुकारले होते, या उपोषणाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शासनाने सकारात्मक भूमिका घेत समितीच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली व काही निर्णय घेऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
पूर्व भागातील नागरिक, विद्यार्थी, कामगार, वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने उपोषणाच्या पहिल्याच दिवशी नागरिक, शेतकरी, व्यावसायिक तसेच तरुण मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता.यावेळी नागरिकांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल प्रशासनाच्या दुर्लक्षाचा तीव्र निषेध व्यक्त केला होता.
पूर्व भागातील ग्रामस्थांनी या उपोषणा वेळी आपली ताकद आणि एकजूट प्रशासनाला दाखवून दिली, आता खरी परीक्षा प्रशासनाची आहे. त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यास भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हा संघर्ष केवळ रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नसून, प्रशासनाला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी आहे. लोकशाहीत लोकशक्ती किती महत्त्वाची असते, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. आंदोलन ठिकाणी पूर्व भागातील सर्व सरपंच राजकीय पदाधिकारी ग्रामस्थ तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बुधवारी बांधकाम विभागाच्या वरिष्ट अधिकारी यांच्या सोबतच्या बैठकीत काय निर्णय होईल या वर कृती समिती चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल,रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा काम सुरू केले आहे.सदरील उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
• शुभम शेटे (पूर्व विभाग रस्ता विकास कृती समिती, उपोषणकर्ते)
उपोषणाने प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलीच जाग आली आहे. पूर्व भागातील सरपंच आणि ग्रामस्थ यांच्या मदतीने महत्वपूर्ण सारोळा वीर आणि भोंगवली मुख्य रस्त्याचे नवीन काम लवकरच सुरू होईल.
• अजय कांबळे (उपोषणकर्ते)




