सांगलीच्या युवकास स्वस्त सोन्याचा मोह नडला : दहा लाख पन्नास हजाराची फसवणूक
कापूरहोळ : स्वस्तात सोने मिळत असल्याचे आमिष एका युवकास चांगलेच महागात पडले आहे. समोरील टोळीने विश्वास संपादन करून त्यांच्याकडील १० लाख ५० हजाराची रोकड घेवून पोबारा केल्याची घटना भोर तालुक्यातील कापूरहोळ, जवळील मौजे निगडे येथे दि. ४ ऑगस्ट ला सायंकाळी ६:३० ते ७:०० च्या दरम्यान घडली आहे. जयकुमार बाबासो नरदेकर (वय ४७ वर्ष) तालुका मिरज, जिल्हा सांगली अशी फसवणूक झालेल्या नावे आहेत. या प्रकरणी जयकुमार नरदेकर यांच्या तक्रारीवरून राजगड पोलिस ठाण्यात ३ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
राजगड राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवक जयकुमार बाबासो नरदेकर (वय ४७, रा. कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली) यांनी तक्रार दिली असून त्यांनी सांगितले की, दि. ४ ऑगस्ट २०२५ दरम्यान, मौजे निगडे गावाच्या हद्दीतील कापुरहोळ-भोर रस्त्याच्या कडेला, कृष्णा प्रकाश तुपे (रा. वडजल, ता. माण, जि. सातारा), राहुल चव्हाण (रा. वराडे, ता. कराड, जि.सातारा) आणि बुवा ठाकुर (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) या तिघांनी संगणमत करून विश्वास संपादन करुन रोख रक्कम १०,५०,००० घेऊन माझी फसवणुक केली.
जयकुमार नरदेकर यांना कापूरहोळ येथे बोलवून ३०,००० रुपये प्रति तोळा दराने सोनं देतो, पैसे घेऊन ये असे सांगुन बोलावले. त्यांनी त्यांच्या विश्वासाला बळी पडून रोख १०,५०,०००/- रुपये या तिघांना दिले. मात्र, यानंतर त्यांनी सोनं न देता, पैसे घेऊन पोबारा केला. पैसे ही गेले आणि सोने न मिळाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी नाना मदने पुढील तपास करत आहेत.




