क्राईम

प्रेमसंबंधांतून जन्मलं हत्याकांड ! नकुल भोईर प्रकरणात पोलिसांचा धक्कादायक खुलासा


 

पिंपरी-चिंचवड : पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या हत्येचे रहस्य पोलीस तपासात उकलले असून, या भीषण घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. नकुल भोईर यांची पत्नी चैताली भोईर हिने तिच्या प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार याच्या मदतीने त्यांचा खून केल्याचे चिंचवड पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

• संशयास्पद मृत्यूचे भयावह रूप

शुक्रवारी पहाटे नकुल भोईर मृतावस्थेत सापडले. सुरुवातीला घटनेचा अपघाती मृत्यू म्हणून विचार करण्यात आला होता. परंतु पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असता, नकुल यांच्या मृत्यूचे चित्र वेगळेच समोर आले. तपासादरम्यान चैताली भोईरच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्या. कसून चौकशी केली असता, तिनेच आपल्या पतीचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. या कृत्यात चैतालीला प्रियकर सिद्धार्थ पवार याची साथ मिळाली होती. दोघांकडून हत्या करण्यासाठी वापरलेली दोरी, मोबाइल संपर्क, आणि ठिकाणाचे पुरावे पोलिसांनी जप्त केले आहेत.

• वादातून जन्माला आले कटकारस्थान

Advertisement

पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार नकुल भोईर हे समाजकारणात सक्रिय असले तरी घरगुती आयुष्यात तणाव निर्माण झाला होता. नकुल हे पत्नीला वागणुकीबाबत समजावत असत विशेषतः मद्यपान, परपुरुषांसोबत संपर्क आणि आर्थिक व्यवहार यांवरून त्यांच्यात वाद होत होते. या गोष्टींचा राग मनात धरून चैतालीने नकुलचा जीव घेण्याचा निर्णय घेतला आणि प्रियकरासह हत्येचा कट रचला.

• सामाजिक क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्ते

नकुल भोईर हे पिंपरी-चिंचवड परिसरात ओळखले जाणारे कार्यकर्ते होते. त्यांनी मराठा क्रांती मोर्चा आणि अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावली होती. त्यांच्या संपर्कात स्थानिक राजकारणी आणि अनेक संघटना होत्या. भविष्यात पत्नी चैतालीला नगरसेवक बनवण्याचा त्यांचा संकल्प होता.मात्र हत्याकांडाच्या धक्कादायक घटनेने हे संपूर्ण स्वप्न कोसळले आहे.

• पुढील कारवाई सुरू

चिंचवड पोलिसांनी जलद गतीने तपास करून प्रकरण उकलले असून आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून घटनास्थळी संकलित पुरावे न्यायवैद्यक तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाने केवळ एका कुटुंबाचाच नाही तर संपूर्ण समाजाचाही विश्वास हादरवला आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!