राजगड (वेल्हे) तालुक्यात तीन दिवस महा ई-सेवा केंद्र चालकांचे कामबंद आंदोलन
राजगड : पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील महा ई-सेवा केंद्र चालकांनी गेल्या तीन महिन्यांपासून थकलेले कमिशन न मिळाल्याच्या निषेधार्थ तीन दिवसांचे कामबंद आंदोलन जाहीर केले आहे. हे आंदोलन 12 ते 14 नोव्हेंबरदरम्यान होणार असून या काळात सर्व ई-सेवा केंद्रे बंद राहणार आहेत.चालक संघटनेच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार तीन महिन्यांपासून शासनाकडून कोणतेही कमिशनचे पैसे न मिळाल्याने अनेक चालक आर्थिक अडचणीत आले आहेत.
ई-सेवा केंद्रांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक शासकीय सेवा सहज उपलब्ध होत असल्या तरी मागील काही काळापासून तांत्रिक आणि आर्थिक अडचणींमुळे या सेवांचा गतीमानपणा कमी झाला आहे. संघटनेने मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि थकबाकी तातडीने मिळावी, यासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे.
तसेच आंदोलन काळात नागरिकांना महत्त्वाच्या सेवा जसे की आधार दुरुस्ती, प्रमाणपत्रे, करसंबंधी व्यवहार आणि शासकीय अर्ज सादरीकरण यात अडथळा येणार असल्याची शक्यता आहे. शासनाने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.




