कापूरहोळ येथे ट्रान्सफॉर्मर फोडून ८० किलो तांबे गायब ! राजयोग बिल्डिंग अंधारात !! पोलिसांचा तपास सुरू
कापूरहोळ : भोर तालुक्यातील कापूरहोळ गावात अज्ञात चोरट्यांनी वीज विभागाचा ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तब्बल ८० किलो तांब्याची (कॉपर) वायर चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे वीज विभागाचे सुमारे ३२ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी संजय उत्तम गोरड (वय ४४, रा. संगमनेर, ता. भोर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ५ नोव्हेंबरच्या सायंकाळी सहा वाजल्यापासून ते ६ नोव्हेंबरच्या सकाळी दहा वाजेदरम्यान घडली. कापूरहोळमधील राजयोग कॉम्प्लेक्सच्या मागे ओढ्याच्या कडेला बसवलेला ट्रान्सफॉर्मर अज्ञात चोरट्यांनी फोडला. त्यांनी ट्रान्सफॉर्मरचे तेल टाकी खाली पाडून तेल सांडवले आणि वायडिंगमधील तांबे काढून नेले. परिणामी ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे निकामी झाला आणि परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिस ठाण्याचे अंमलदार पोलीस हवालदार मुंढे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर अज्ञात आरोपीविरुद्ध भोर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्राथमिक अंदाजानुसार ही चोरी पूर्वनियोजित पद्धतीने करण्यात आली असावी. चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर वेगळे काढून स्क्रॅप बाजारात विक्रीसाठी नेले असावेत, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. या घटनेमुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, गावात किंवा परिसरात रात्रीच्या वेळेस कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना रोखता येतील.
राजगड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास कोल्हे करत आहेत.




