भोर रायरेश्वर किल्ल्यावर मद्यप्राशनाचा प्रकार ! शिवप्रेमींचा संताप !! सोशल मीडियावर संतापाची लाट
विशाल शिंदे,
प्रतिनिधी.
भोर : पुणे जिल्ह्यामधील भोर तालुक्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेला रायरेश्वर किल्ला पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. किल्ला परिसरात काही युवकांनी मद्यप्राशन केल्याचा प्रकार समोर आला असून, उपस्थित असलेल्या शिवप्रेमींनी त्यांना जाब विचारत अनुचित वर्तनाला आळा घातला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर नागरिक आणि गडप्रेमींत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि १९) रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेल्या काही शिवभक्तांना रस्त्याच्या कडेला मद्यपान करणारे परप्रांतीय युवक दिसले. त्या युवकांना सज्जन शिवप्रेमींनी तत्काळ थांबवले तसेच त्यांच्या हातातील दारूच्या बाटल्या फोडल्या. या घटनेचा व्हिडिओ काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि संतापाची लाट उसळली.सध्या मद्यपान करणारे युवक आणि हस्तक्षेप करणारे शिवप्रेमी यांची ओळख निश्चित झालेली नसली तरी पोलिस प्रशासनाने या घटनेची दखल घेत पुढील कारवाईची शक्यता व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांनी किल्ल्याच्या पवित्रतेचा अपमान झाल्याची तीव्र भावना व्यक्त करून, अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.रायरेश्वर किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतल्याचे ऐतिहासिक स्थळ असून, महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे येथे होणारे अनुचित प्रकार किल्लाप्रेमींसाठी अत्यंत दुखद ठरत आहेत. स्थानिक नागरिकांनी सर्व पर्यटकांना आवाहन केले आहे की,
इतिहासाचे हे स्थान आपली ओळख आहे; येथे शिस्त,आदर आणि स्वच्छता राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.




