ताज्या घडामोडी

भोंगवली गणातून पद्मा जाधव रिंगणात ! लोकाभिमुख कार्यामुळे मतदारांमध्ये निर्माण झाला विश्वास


 

किकवी : भोर तालुक्यातील भोंगवली गणात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण तापले आहे. आचारसंहितेच्या हालचालींना सुरूवात होताच, अनेक इच्छुक उमेदवार जनसंपर्काचा धडाका लावत आहेत. मात्र या राजकीय हलचालींमध्ये वागजवाडी गावच्या माजी सरपंच पद्मा जाधव यांचं नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. शांत, संयमी आणि कार्यकर्तृत्वशील स्वभावामुळे त्यांनी मतदारांच्या मनात विश्वासार्ह स्थान निर्माण केलं आहे.

पद्मा जाधव यांनी सरपंच पदाच्या कार्यकाळात गावविकासाची नवी दिशा निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली गावात “घर तिथे नळ” ही योजना यशस्वीरीत्या पूर्ण होऊन 100 टक्के नळपाणीपुरवठा सुनिश्चित झाला. महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न करून महिला सभांच्या माध्यमातून महिलांना निर्णयप्रक्रियेत सहभागी केलं. त्यांच्या पुढाकाराने तंटामुक्त गाव अभियान यशस्वी ठरलं आणि वागजवाडीला “तंटामुक्त गाव” पुरस्कारासह पाच लाख रुपयांचं बक्षीस मिळालं.

Advertisement

स्थानिक विकासकामांबरोबरच, पद्मा जाधव यांनी महसूल, पंचायत समिती आणि इतर शासकीय विभागांमधून सर्वसामान्य लोकांची कामं करून घेतली. कोणत्याही सामाजिक प्रसंगात त्यांचा सक्रिय सहभाग रहातो, मग आनंदाचा क्षण असो वा दुःखाचा प्रसंग. त्यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल एक जवळिकीची भावना निर्माण झाली आहे.

त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना “आदर्श सरपंच पुरस्कार” उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. आज भोंगवली गणात त्यांच्या उमेदवारीबाबत जनतेमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. अनेक राजकीय पक्षांकडून त्यांना अधिकृत उमेदवारीची ऑफर दिल्याचंही बोललं जात आहे.

त्यांच्या प्रभावशाली कार्यशैलीमुळे आणि लोकसंपर्कामुळे पद्मा जाधव या निवडणुकीत एक बलाढ्य उमेदवार ठरतील अशी शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.”सामान्य माणसाच्या सुखदुःखात सहभागी होणं हीच खरी लोकसेवा” असं पद्मा जाधव सांगतात, आणि त्यांच्या कार्यातून त्यांनी हे शब्द खरे ठरवले आहेत. परिणामी भोंगवली गणात सध्या त्यांच्याच नावाची चर्चा आणि त्यांच्या नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त होताना दिसत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!