तुटलेल्या विजेची तार अंगावर पडुन बैलाचा दुर्दैवी अंत : शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान
नसरापूर : मादगुडेवाडी, तांभाड, ता.भोर,पुणे दि : 27/7/2024 (शनिवार) रोजी महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याचा आवडता राजा नावाचा बैल दगावला आहे.
शेतकरी काळुराम बारकु सोंडकर वय 65 वर्ष हे नेहमी प्रमाणे पाऊल वाटेने त्याचे दोन बैल जोडी घेऊन शेताला भात पिका करीता गाळ करण्यास जात असताना, वाटेच्या बाजुने जाणाऱ्या विद्युत पोलच्या खांबावरील विद्युत प्रवाहाची तार अचानक तुटुन बैलाच्या अंगावर पडली एका बैलाला शॉक लागल्याने तो बैल त्याच ठिकाणी मरण पावला.
शेताला जात असताना बैलाचा कासरा शेतकऱ्याच्या हातामध्ये होता, त्याचे नशीब बलवंतर होते म्हणून तो शेतकरी वाचला ही घटना दिनांक 27 /7/24 रोजी सकाळी 9:15 च्या दरम्यान घडली, असून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचे अंदाजे 80,000/- रूपयाचे नुकसान झाले असून शासनाने याची गंभीरतेने नोंद घेऊन त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
या भागात 4/5 दिवस जोरदार पाऊस झाला होता. या जोरदार पावसामुळे महावितरण कंपनीची आधीच सैल असलेल्या विजेची तार तुटली असावी आणि त्यातून ही मोठी घटना घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान वेळीच लक्ष देऊन जर हे विजेची तार ओढून घेऊन व्यवस्थित केली गेली असती तर कदाचित आज ही घटना घडली नसती, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. या घटनेमुळे गावात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.




