स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला अटक : कोर्टाकडून 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
पुणे : स्वारगेट एस टी बस स्थानकातील तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्ता गाडे याचा शोध घेण्यास पुणे पोलिसांना अखेर यश आले आहे. आरोपीला त्याच्याच गावात असलेल्या एका शेतातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांच्या मदतीने पोलीसांनी ही कारवाई केली आहे.
तरुणीवर बलात्कार केल्यानंतर गाडे हा आपल्या गुणाट या गावी आला होता. महाशिवरात्री असल्याने तो तिथल्या कीर्तन कार्यक्रमात देखील सहभागी झाला होता. मात्र माध्यमांवर त्याचा फोटो आल्यानंतर तो तिथून फरार झाला होता. गावकऱ्यांनी त्याला गावात आल्याचे पाहिले होते. त्यानुसार पोलिसांच्या 13 पथक त्याचा शोध घेण्यासाठी तैनात करण्यात आली होती. श्वान पथक, ड्रोनच्या माध्यमातून त्याचा शोध सुरु होता. गावात आणि आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध सुरु होता. पोलिसांनी दिवसभर शोधाशोध करून देखील तो सापडला नव्हता. मात्र मध्यरात्री दीडच्या सुमारास तो पोलिसांना सापडला.
बलात्कारच्या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र 2 दिवसांच्या शोध मोहिमेला अखेर यश आले आहे. त्याला पकडल्यानंतर स्वारगेट पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आरोपी दत्ता गाडेला आज कोर्टामध्ये हजर करण्यात आले त्याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पण दत्ता गाडेच्या वकिलांनी कोर्टामध्ये भलताच दावा केला आहे. पीडित महिला सहमतीनेच त्याच्यासोबत बसमध्ये गेली होती, असा युक्तिवादच केला आहे. तसंच हे प्रकरण फारसं गंभीर नाही, असा युक्तिवादही केला.




