विहिरीत पडून अलका लिमण यांचा मृत्यू ! पारवडी गावात हळहळ
नसरापूर : भोर तालुक्यातील पारवडी गावातील अलका किसन लिमण वय वर्ष 50 या महिलेचा मृतदेह गावाजवळील शेतातील विहिरीत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सकाळपासून त्या बेपत्ता असल्याने नातेवाईक व ग्रामस्थ त्यांचा शोध घेत होते. अखेर त्यांच्या शोधमोहीमेला आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने विराम लागला.
खबर देणारे लहु बापुराव लिमण (वय 35) यांनी सांगितले की, ते स्वतः तसेच त्यांचे चुलत भाऊ आणि काही गावकरी मिळून अलका यांचा शोध घेत होते. शोधादरम्यान जमीन गट क्रमांक 163 मधील दत्तात्रय हरीभाऊ लिमण यांच्या शेतातील विहिरीत काही हालचाल दिसल्याने संशय आला. तत्काळ हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाला माहिती देत मदत मागवण्यात आली.
आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. रेस्क्यू टीममधील गणेश सपकाळ, संदीप सोळसकर, संजय चोरगे, संतोष भगत, योगेश गोपी आणि प्रतीक महामुनी यांनी समन्वयाने प्रयत्न करून अलका लिमण यांचा मृतदेह बाहेर काढण्यास यश मिळवले. मृतदेह ऍम्ब्युलन्समधून सिद्धीविनायक हॉस्पिटल, नसरापूर येथे हलवण्यात आला. तेथे डॉक्टरांनी तपासून साडेबारा वाजण्यापूर्वीच त्या मृत झाल्याची खात्री दिली.
या घटनेची नोंद राजगड पोलीस स्टेशनमध्ये अ.म.रजि. क्रमांक 123/2025 BNSS 194 नुसार करण्यात आली आहे. नातेवाईकांनी या मृत्यूबाबत कोणताही संशय नसल्याचे पोलिसांना कळवले आहे. पो. हवा. मुंढे यांनी प्राथमिक नोंद घेतली असून तपास सहाय्यक पोलिस फौजदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. प्रभारी अधिकारी म्हणून पो.नि. गवळी यांनी पुढील प्रक्रिया पार पाडली.
अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे पारवडी गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी अलका लिमण यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.




