भोर नगरपालिका निवडणुकीत आरपीआय (आठवले) गटाची भाजपकडे एका जागेची मागणी
भोर : भोर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत हालचालींना वेग आला असून आरपीआय (आठवले) गटाने भाजपकडे एका जागेची मागणी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास स्वबळावर निवडणूक लढविण्याचा इशारा भोर तालुका युवक अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी दिला आहे.
त्यांनी स्पष्ट केले की, आरपीआय (आठवले) हा महायुतीतील जुना, विश्वासू आणि निष्ठावंत मित्र पक्ष असल्याने जुन्या साथीदारांना डावलणे योग्य ठरणार नाही.
स्वप्नील सावंत म्हणाले, “आजवर आम्ही कोणत्याही लोकसभा, विधानसभा किंवा जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारीची मागणी केली नाही. मात्र आता नगरपालिका निवडणुकीत एक राखीव जागा आम्हाला दिली जावी, अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही सत्तेसाठी नव्हे, तर न्यायासाठी लढत आहोत.
महायुतीचा पाया जेव्हा रचला गेला, तेव्हाच आमचा पक्ष त्यात सहभागी झाला. त्यामुळे आम्हाला नवखे समजू नये.”त्यांनी भाजपला सूचित केले की, त्यांनी जुन्या आणि विश्वासू सहकाऱ्यांचा सन्मान राखावा. “जर आमच्या मागणीची दखल घेतली नाही, तर आरपीआय (आठवले) स्वबळावर निवडणूक लढवेल किंवा तटस्थ भूमिकाही स्वीकारेल. परंतु आरपीआयचा सन्मान कोणत्याही परिस्थितीत गमावला जाणार नाही,” असे सावंत यांनी स्पष्ट केले.
शेवटी त्यांनी पत्रकार बांधवांना आवाहन करत म्हटले की, “महायुतीतील आमच्या न्याय मागणीची दखल घेऊन ती समाजापर्यंत पोहोचवावी,” असे आवाहन त्यांनी केले.




