भोंगवली-कामथडी गटातील राष्ट्रवादी (अजित पवार) बूथ कमिटी आढावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न
कापूरहोळ : भोंगवली-कामथडी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार ) यांच्या बूथ कमिटी आढावा बैठकीत उत्साही वातावरणात कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. पक्षाचे इच्छुक उमेदवार चंद्रकांत बाठे यांच्या पुढाकाराने कापूरहोळ येथे ही बैठक पार पडली. आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत बूथ प्रमुख, स्थानिक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बैठकीत निवडणुकीसाठी बूथस्तरावर संघटन मजबूत करण्यावर बाठे यांनी विशेष भर दिला. त्यांनी गटातील सर्व बूथ प्रमुखांशी थेट संवाद साधत सांगितले की, ही निवडणूक विकासाच्या ध्येयाने लढवायची आहे. मतदारांशी थेट संपर्क साधण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या डिजिटल अॅपद्वारे माहिती संकलन आणि प्रचार नियोजन कसे करायचे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पक्षाच्या धोरणांची प्रभावी मांडणी कशी करावी, प्रचारात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, यावरही विचारविनिमय झाला. चंद्रकांत बाठे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की, “निवडणूक म्हणजे फक्त मतदान नव्हे, तर गावाच्या सर्वांगीण विकासाची दिशा ठरवणारी प्रक्रिया आहे.
कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदाराशी प्रामाणिक संवाद साधून, त्यांचे प्रश्न समजून घेणे आणि पक्षाच्या चालू विकास योजना पोहोचवणे ही खरी निवडणूक तयारी आहे, त्यांनी पुढे सांगितले की, “ग्रामविकास, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि शेती या चार प्रमुख क्षेत्रांवर आपले लक्ष केंद्रित राहिले पाहिजे. जनतेच्या विश्वासावर आधारित निवडणूकच आपल्याला खरा विजय देईल, बैठकी दरम्यान बूथ कमिटी सदस्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आल्या. प्रचारादरम्यान शिस्त, संयम आणि सकारात्मक संवादाचे महत्त्व सर्वांना पटवून देण्यात आले. डिजिटल प्रचारामध्ये सोशल मीडियाचा वापर करताना जबाबदारीने वागावे, असेही आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्थानिक कार्यकर्त्यांनी केले. बैठकीच्या शेवटी सर्व बूथ प्रमुखांनी एकजुटीने काम करून आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) उमेदवाराला विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे आयोजन व समन्वय चंद्रकांत बाठे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या प्रसंगी अनेक स्थानिक पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




