ओबीसी आरक्षणाच्या जागांवर ओबीसी उमेदवारांनाच संधी द्या : शरद पवारांचे निर्देश
मुंबई : महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. ओबीसी आरक्षण असलेल्या जागांवर ओबीसी समाजातील उमेदवारांनाच संधी द्यावी, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी बैठकीत मांडली, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांनाच संधी द्या, अशी स्पष्ट सूचना शरद पवारांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पदाधिकारी, आमदार, खासदारांना दिली. मात्र ज्या ठिकाणी मूळ ओबीसी उमेदवार मिळणार नाही, केवळ त्याच ठिकाणी पर्यायी कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या इच्छुकाला संधी द्या, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईत शनिवारी झालेल्या या बैठकीस राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाचे राजकारण पुन्हा केंद्रस्थानी आले आहे. या संदर्भात पवारांनी पार्टीची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “ओबीसी समाजाला न्याय देणे, ही आपली सामाजिक आणि नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे ज्या जागा ओबीसी आरक्षणाखाली येतात, त्या ठिकाणी इतर घटकातील उमेदवारांना संधी देता कामा नये.”बैठकीत कोअर कमिटी सदस्यांनी विविध जिल्ह्यांतील स्थानिक समीकरणांचा आढावा घेतला.
शरद पवार म्हणाले की पक्षाने सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व द्यावे, पण आरक्षित घटकांचा हक्क कोणत्याही राजकीय समीकरणासाठी कमी करून चालणार नाही. त्यांनी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देत सांगितले की, उमेदवार निवडीत स्थानिक पातळीवरील संघटनांची मते, सामाजिक समतोल आणि कार्यकर्त्यांची निष्ठा या बाबींचा प्राधान्याने विचार करावा.
ओबीसी आरक्षणावरून काही ठिकाणी सुरू असलेल्या वादविवादांच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या या सूचनेला महत्त्व लाभले आहे.
राज्य सरकारने अलीकडेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण पुन्हा लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.बैठकीनंतर पक्षातील नेत्यांनी सांगितले की, पवारांच्या सूचनेमुळे उमेदवारी प्रक्रियेत स्पष्ट दिशा मिळाली आहे. पक्षाने सामाजिक समतेचा संदेश देत ओबीसी समाजातील उमेदवारांना अधिक संधी देण्यासाठी प्रयास सुरू केले आहेत.
पुढील काही दिवसांत प्रत्येक जिल्हास्तरावर उमेदवार निश्चित करण्यासाठी विशेष बैठका घेतल्या जाणार आहेत.राज्याच्या राजकीय वर्तुळात पवारांच्या निर्देशांमुळे ओबीसी मतदारांमध्ये सकारात्मक संदेश गेल्याचे निरीक्षण राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ता समीकरणांवर याचा परिणाम होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.




