पुणे-बेंगलोर महामार्गावरील चेलाडी ब्रिजवर लक्झरी बसचा अपघात ! राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नसरापूर : पुणे बेंगलोर महामार्गावरील चेलाडी ब्रिजवर काल पहाटे लक्झरी ट्रॅव्हल्स बसने मागून जोरदार धडक दिल्याने एक गंभीर अपघात घडला. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी नागेश उत्तम सुतार (वय 37, व्यवसाय-ड्रायव्हर, रा. लक्ष्मी टाकली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 24 ऑक्टोबर रोजी सकाळी अंदाजे पाच वाजताच्या सुमारास सातारा ते पुणे महामार्गावर मौजे नसरापुर, ता. भोर, जि. पुणे येथील चेलाडी ब्रिजजवळ ही दुर्घटना घडली.
फिर्यादी यांनी चालवित असलेल्या बसच्या मागून ए.आर. 20 बी. 7005 क्रमांकाची लक्झरी ट्रॅव्हल्स मोठ्या वेगाने आली आणि नियमांकडे दुर्लक्ष करून बसला जोरदार धडक दिली. या धडकेत बसचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली. संशयित चालक हसन चीस्ति अब्दुल रजाक शेख (वय 23, व्यवसाय-ड्रायव्हर, रा. सावंतवाडी माठेवाडा, सेंटर इंग्लिश स्कूल, जि. सिंधुदुर्ग) याच्यावर अविचाराने वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची नोंद राजगड पोलीस ठाणे गु.र. नं. 381/2025, भारतीय न्या. सं. (BNS) कलम 281, 324(4) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत करण्यात आली आहे. घटनेची नोंद सकाळी 11.25 वाजता स्टेशन डायरी क्रमांक 19 अंतर्गत करण्यात आली.
या प्रकरणी दाखल अमलदार पोलिस कर्मवीर निकम (बॅज क्र. 1054) असून तपासाची जबाबदारी पोलिस हवालदार पडळकर (बॅज क्र. 1798) यांच्याकडे देण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
राजगड परिसरातील महामार्गावर सकाळच्या वेळेत वाढत्या वाहनांमुळे वारंवार अपघात घडत असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या प्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी वाहनचालकांना वेगमर्यादा व वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.




