दुर्दैवी घटना : विजेचा शॉक लागून 36 वर्षीय तरुणाचा मृत्यू
कामथडी : पुणे-बेंगलोर हायवे लगत असणाऱ्या भोर तालुक्यातील कामथडी गावच्या हद्दीतील खुटवडवस्ती मध्ये बुधवार दि. 14 मे रोजी एक हृदयदावक घटना घडली, राजेंद्र चंद्रकांत खुटवड वय वर्ष 36 हा तरुण स्वतःच्या घरा शेजारी पाण्याची मोटर चालू करत असताना त्याला विजेचा जबरदस्त शॉक लागल्यामुळे तो बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडला होता.
वस्तीवरील नातेवाईकांनी तातडीने त्याला सिद्धिविनायक हॉस्पिटल नसरापूर येथे दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, मृत राजेंद्र हा वडील, पत्नी, दोन मुले आणि मोठ्या भावासह खुटवड वस्ती येथे वास्तव्यास होता. त्याच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




