देऊळजाई माता मंदिराच्या दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला ! सीसीटीव्हीवर चिखल फासून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
कापूरहोळ : भोर तालुक्यातील दिवळे येथील प्रसिद्ध श्री देऊळजाई माता मंदिराला अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री लक्ष्य करत बाहेरील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली. धार्मिक स्थळात चोरी झाल्याने दिवळे परिसरात खळबळ उडाली असून भाविक व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर चिखल फासला. त्यामुळे चोरीची दृश्ये कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद होऊ नयेत, तसेच पुरावे नष्ट करता यावेत, असा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर चोरट्यांनी मंदिराबाहेरील दानपेटी फोडून त्यातील रोकड घेऊन पोबारा केला. दानपेटीत सुमारे ५० हजार रुपयांच्या आसपास रक्कम असावी, असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
सकाळी मंदिर परिसरात दानपेटी फोडल्याचे निदर्शनास येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. देवस्थानालाच चोरट्यांनी लक्ष्य केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली.
घटनेची माहिती मिळताच किकवी पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजसह उपलब्ध तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरातील मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.




