न्हावी विकास सोसायटीची ६६ वी वार्षिक सभा मोठया उत्साहात संपन्न
भोर : भोर तालुक्यातील सर्वात मोठ्या व सर्वोत्कृष्ट संस्थांपैकी न्हावी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भालचंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली.
सोसायटीचे सचिव संतोष सोनवणे यांनी विकास सोसायटीने २०२४–२५ मध्ये तब्बल १०.५६ लाखांचा नफा कमावल्याची माहिती सादर केली. तर सभासदांना २०२३–२४ या वर्षासाठीचा लाभांश दिवाळीपूर्वी वाटप करणार असल्याचे चेअरमन अंकुश चव्हाण यांनी जाहीर केले.
सोसायटीतील कर्मचारी व सभासदांना मार्गदर्शन करताना भालचंद्र जगताप वसुलीवर भर देऊन सोसायटीचे आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवण्याच्या सूचना केल्या. भविष्यात शेतकरी व सभासदांना गुजरातमध्ये शेतकरी अभ्यास दौरा काढणार असल्याची माहिती दिली.
सभेला पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, संचालक, पदाधिकारी, मान्यवर व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.




