गुड टच, बॅड टच बाबत मुलींनी जागृत व्हावे : महिला पोलिस हवलदार प्रमिला निकम
नसरापूर : दि. 12 /9/24 (गुरुवार) कामथडी ता भोर, जि.पुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील इयत्ता 5 ते 10 वी मधील मुला-मुलींना तसेच महिला, व पालकांना राजगड पोलिस स्टेशनच्या कर्तव्य दक्ष महिला पोलिस हवलदार प्रमिला निकम यांनी कायदे विषयक मार्गदर्शन केले.
आजकाल घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांमुळे पालकांची चिंता वाढली आहे. मुलींना घराबाहेर पाठवताना किंवा अनोळखी व्यक्तीसोबत पाठवताना पालक दहा वेळा विचार करतात. तुमच्या वयात येत असलेल्या मुलींना काही गोष्टी सांगणे आवश्यक आहे, कोणता माणूस कोणत्या हेतूने स्पर्श करत आहे, हे त्यांना समजले पाहिजे. तुमच्या पाल्यासोबत मैत्रीचे नाते निर्माण करुन तुम्ही स्वतः त्यांना गुड टच आणि बॅड टच विषयीची माहिती सांगणे आवश्यक आहे. गुड टच आणि बॅड टच शिकवण्यासाठी तुम्ही काय करु शकता, गुड टच बॅड टच, मोटीवेशनल स्पीच, निर्भया संदर्भात जनजागृती, पोसको तसेच सायबर क्राईम व बालविवाह या संदर्भात माहिती दिली.
एखादी अनोळखी व्यक्ती किंवा टवाळखोर मुलगा आपल्याकडे वाईट हेतुने बघतो आहे, डोळ्याने अथवा हाताने वाईट इशारे करतो आहे, आपल्या एकटेपनाचा अथवा गर्दीची संधी साधुन आपल्या शरीराला स्पर्श करतो आहे, तर समजायचे की तो आपल्याला बॅड टच करीत आहे. असा स्पर्श मुलींना टाळायचा असतो.
मुलींनी येथून पुढे आत्मनिर्भर तथा निडर होऊन शिक्षण घ्यावे. स्वसंरक्षणासाठी कराटे, बॉक्सिंगचे प्रशिक्षण घ्यावे व योग प्राणायाम व्यायाम करून आपले शरीर बळकट बनवावे व मनात उच्च ध्येय ठेवून त्या दिशेने वाटचाल करावी व एक ना एक दिवस ते ध्येय काबीज करावे व आपल्या आई-वडिलांचा, शाळा,गाव, राज्य, देशाचा नावलौकिक करावा, असे आवाहन यावेळी बोलताना त्यांनी मुलींना केले.
तसेच डायल 112 संदर्भात माहिती देऊन महिलांना व त्यांचे मुला मुलींना अडीअडचणी आल्यास त्यांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक दिला तसेच राजगड पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या आहे.




