भोर तालुक्यातील बहुतांशी गणपतीचे सातव्या दिवशी विसर्जन
कापूरहोळ : भोर तालुक्यातील बहुतांशी गणरायांचे सातव्या दिवशी विसर्जन होत असल्याचे पहावयास मिळाले. गणरायाच्या आगमनापासून घराघरात दिवस-रात्रं पुजापाठ, आरती इत्यादी धार्मिक विधी सुरू होतात. घरोघरी गणेशमूर्ती प्रतिष्ठापना, गौरी आवाहन, गौरी पूजन आदी कार्यक्रम मोठ्या उत्सवात झाले. गौराईच्या आगमनानंतर आनंदात भर पडली होती.
घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करत असताना गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात, पारंपरिक वाद्ये, गौराई गीते व फटाक्यांची आतषबाजी करत सातव्या दिवशी घरगुती गणेशमूर्तीना निरोप देण्यात आला. गावागावांत मूर्ती विसर्जन करण्यात आल्या.
भावपूर्ण वातावरणात शुक्रवारी दुपार नंतर घरगुती गणपती मूर्ती विसर्जन करण्यात आल्या. सारोळयाच्या निरा नदी काठी, गुंजवणी नदी काठी तसेच धरण भागात विविध ठिकाणी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनास व निर्माल्य संकल्पनास तालुक्यात चांगला प्रतिसाद पहावयास मिळाला.
गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी विघ्नहर्त्याचे दूत असलेले किकवी चौकीचे पोलीस कर्मचारी (राजगड पोलीस स्टेशन) अलर्ट मोडवर आले होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नदी भागात लक्ष देऊन होते कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन पेट्रोलिंग वगैरे चालु होते.




