श्री शिवजी विद्यालय कापूरहोळ येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन ! तब्बल 28 वर्षांनंतर दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची भरली शाळा
कापूरहोळ : श्री शिवाजी विद्यालय कापूरहोळ येथे तब्बल 28 वर्षांनी माजी विद्यार्थ्यांची शाळा भरली, सुमारे 45 विद्यार्थ्यांकडुन एकत्र येऊन मोठ्या उत्साहात स्नेहसंमेलन कार्यक्रम साजरा करण्यात आला, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन मुख्याध्यापक साळुंखे सर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण होते.
शाळेतील सवंगडी, शाळेचा वर्ग, लाकडी बाक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते. शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच. म्हणूनच श्री शिवाजी विद्यालय कापूरहोळ या शाळेतील 1996 -1997 वर्षीच्या दहावी बॅचचे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र आले होते. तब्बल 28 वर्षांनी जुने सवंगडी पुन्हा भेटल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
सर्व वर्गमित्र परत एकाच मंचावर आले होते. धकाधकीच्या जीवनातून 1997 बॅचच्या काही माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संपर्क साधून स्नेहमेळावा घेतला. त्यासाठी त्यावेळचे सर्व वर्गमित्र व शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते. शाळेच्या इमारतीत माजी विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत
सर्व प्रथम सरस्वतीचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली,
यावेळी दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक साळुंखे सर, भांडे सर तसेच सर्व आजी-माजी शिक्षक उपस्थित होते. यावेळी उपस्थित अध्यक्ष व सर्व आजी आणि माजी शिक्षक वर्ग तसेच प्रमुख पाहुणे यांचा माजी विद्यार्थ्यांनी शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान केला.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक यांनी येणारा काळ व पालक म्हणून तुमच्या समोरची आव्हाने याची विद्यार्थ्यांना जाणीव करुन देत त्यांना यशस्वी वाटचालीस सदिच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रातील यशाबद्दल व असा उत्कृष्ठ कार्यक्रमाची संकल्पनेचे यशस्वी आयोजन करुन आम्हा सर्व शिक्षकांना सन्मानित केल्याबद्दल मुख्याध्यापक साळुंखे सरांनी विद्यार्थ्यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
कापूरहोळ शाळेतुन सर्व विद्यार्थी आणि शिक्षक सारोळा येथील सयाजी हॉटेल मध्ये गेले त्याठिकाणी पूर्वनियोजित स्नेहभोजनाचा आनंद घेत संगीत कार्यक्रमात सहभागी झाले, कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकमेकांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत पुढील वर्षी न चुकता स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाकरिता उपस्थित राहण्याचे वचन देत एकमेकांचा निरोप घेतला.




