भोर तालुक्यातील माझेरी व निवंगण शाळांमधील विद्यार्थीनींना सायकलचे वाटप : ध्रुव प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम
वसंत मोरे,
प्रतिनिधी.
भोर : १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत भोरमध्ये १० सायकलीचे मोफत वाटप करण्यात आले, भोर तालुक्यातील दुर्गम भागातील माझेरी व निवंगण शाळांमधील विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी दररोज अंदाजे ३ किलोमीटर पायी जावे लागत होते. याची दखल घेत ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर यांनी हा उपक्रम राबविला असुन आता शाळेत येण्यासाठी मुलींची पायपीट थांबणार आहे.
शिक्षणाधिकारी संजय नाईकवडे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून सायकल बँक हा पथदर्शी उपक्रम सुचवला. त्या अनुषंगाने भोर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी किरण कुमार धनवाडे यांनी केलेल्या आवाहनाला टिटेघर येथील ध्रुव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजीव केळकर यांनी उत्तम प्रतिसाद दिला. विद्यमान आमदार शंकर मांडेकर, माजी आमदार संग्राम थोपटे, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या हस्ते विद्यार्थिनींना सायकलचे वितरण करण्यात आले.
ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर यांनी पुढील काळात १०० विद्यार्थीनींना सायकल देण्याचा मानस व्यक्त केला. शाळेत जाण्यासाठी सायकल मिळाल्याने मुलींनी समाधान व्यक्त करुन राजीव केळकर यांचे आभार मानले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गोरड यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिवन शिंदे यांनी मानले.




