सायबेज आशा कंपनीचा किवतच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा नवा आदर्श ! गुणवत्तेच्या वाटचालीला भक्कम आधार !! शाळेला इंटरॅक्टिव्ह बोर्ड भेट
प्रतिनिधी,
वसंत मोरे, भोर.
किवत : भोर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी दिशा देत सायबेज आशा कंपनीतर्फे किवत येथील जिल्हा परिषद शाळेस इंटरॅक्टिव्ह बोर्डची भेट देण्यात आली. शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना अधिक समर्पक अध्यापन अनुभव देण्यासाठी सायबेज आशा कंपनीने हा उपक्रम हाती घेतला आहे.
कंपनीच्या सामाजिक जबाबदारीच्या (CSR) उपक्रमाअंतर्गत या भेटीचे आयोजन करण्यात आले. कंपनीचे प्रतिनिधी, स्थानिक ग्रामस्थ, शाळेचे प्राचार्य, शिक्षकवर्ग व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी डिजिटल साधनांच्या माध्यमातून शिक्षण घेण्याचा आनंद आणि उत्साह व्यक्त केला.
सायबेज आशा कंपनीचे प्रतिनिधी यांनी सांगितले की, बदलत्या काळात शिक्षण पद्धतीत तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक झाला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे आधुनिक सुविधांचा लाभ मिळावा, हा उद्देश लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला आहे. इंटरॅक्टिव्ह बोर्डच्या मदतीने शिक्षकांना अध्यापन अधिक आकर्षक व प्रभावीपणे सादर करता येणार आहे.
किवत जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत नवा उत्साह निर्माण झाला आहे. आधुनिक साधनांच्या मदतीने पाठ्यक्रमातील धडे अधिक सखोलरीत्या समजावून घेता येतील. शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच ग्रामस्थांनी सायबेज आशा कंपनीचे मनःपूर्वक आभार मानत त्यांच्या या कार्याचे कौतुक केले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक सादरीकरण करून उपस्थितांचे स्वागत केले.
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी सायबेज आशा कंपनीने उचललेले हे पाऊल प्रेरणादायी ठरत असून, किवतसारख्या गावातील शिक्षणाला डिजिटल दृष्टीकोन मिळवून देणारा हा प्रकल्प ठरत आहे.या माध्यमातून केवळ विद्यार्थ्यांचाच नाही, तर शिक्षकांचाही अध्यापन अनुभव अधिक समृद्ध झाला आहे. डिजिटल साधनांच्या वापरातून शिक्षण अधिक आकर्षक, सुलभ आणि विद्यार्थी-केंद्रित होत आहे. सायबेज आशा कंपनीचा हा उपक्रम ग्रामीण शिक्षणक्षेत्रासाठी आदर्श ठरण्याची शक्यता आहे.




