प्रेमसंबंधासाठी भावी पतीची हत्या ! पुणे ग्रामीण पोलिसांनी उलगडला धक्कादायक कट
पुणे : विवाह निश्चित झालेल्या तरुणाचा नियोजित पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मावळ तालुक्यातील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर फिरायला नेऊन तरुणाला सुमारे ४०० फूट खोल दरीत ढकलून ठार मारण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी तरुणीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
केतन विशाल अगरवाल (वय २५, रा. गहुंजे, ता. मावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर सिया प्रवीण गोयल (वय २०, रा. बिबवेवाडी, पुणे) आणि चेतन बाबुलाल चौधरी (वय २२, रा. कोंढवा बुद्रुक, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन अगरवाल आणि सिया गोयल यांचा विवाह निश्चित झाला होता. मात्र, सियाचे चेतन चौधरी याच्याशी प्रेमसंबंध असल्याने या नात्यावरून वाद निर्माण झाला होता. दरम्यान, १८ जून रोजी केतन आणि सिया लोहगडावर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी सेल्फी काढताना केतनचा तोल जाऊन तो दरीत पडल्याची माहिती सियाने कुटुंबीयांना दिली होती. लोहगडावरील जोरदार वाऱ्यामुळे हा अपघात झाल्याचेही तिने सांगितले होते.
मात्र, मृत्यूबाबत संशय निर्माण झाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. तांत्रिक पुरावे, घटनास्थळावरील माहिती आणि आरोपींची चौकशी यामधून हा अपघात नसून पूर्वनियोजित कटातून करण्यात आलेला खून असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणामुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, प्रेमसंबंध आणि विवाहाच्या वादातून घडलेल्या या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. पुढील तपास पुणे ग्रामीण पोलीस करीत आहेत.




