भोरचे ह.भ.प.राहुल पारठे महाराज महाराष्ट्र गौरव अॅवॉर्ड २०२६’ पुरस्काराने सन्मानित
भोर : सांप्रदायिक क्षेत्रात भोर तालुका अव्वल असतानाच पुन्हा एकदा भोरचे नाव राज्याच्या पटलावर उजळले. ह.भ.प. राहुल महाराज पारठे यांना ह्यूमन राइट्स अँड क्राइम प्रोटेकशन असोशिएटने ‘महाराष्ट्र गौरव अॅवॉर्ड २०२६’ पुरस्काराने सन्मानित केले. हा सन्मान पुणे येथील भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला. तालुक्यातील सर्व स्तरांतून राहुल महाराजांचे अभिनंदन होत आहे.
हिरडस मावळ खोऱ्यात समाजहितासाठी झगडणारे लक्ष्मण पारठे (वडील) यांनी घेतलेला समाजसेवेचा वसा राहुल महाराज पुढे चालवित आहेत. कीर्तनांद्वारे ते समाजपरिवर्तन घडवीत असून, राज्यभर त्यांच्या कीर्तनरूपी सेवेमुळे अनेक तरुण सांप्रदायाकडे वळत आहेत. या कार्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच, आध्यात्मिक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून चिमुकल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचे पवित्र कार्य ते करीत असल्याने त्यांचा ठसा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचला आहे.
राहुल महाराजांच्या या सन्मानाने भोर तालुका अभिमानाने भरून गेला असून, त्यांच्या कार्याला पुढील प्रेरणा मिळेल, अशी खात्री व्यक्त केली जात आहे.




