रायरीच्या शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात ! गुणवंतांचा गौरव !! शाळेच्या विकासाचा संकल्प
भोर : रायरी (ता. भोर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने आयोजित माजी विद्यार्थी मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या विशेष उपक्रमांतर्गत शाळेच्या वतीने माजी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन, रांगोळ्या काढून आणि औक्षण करून जंगी स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच सूर्यकांत किंद्रे होते. मुख्याध्यापक हरी महांगरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी उपसरपंच संदीप किंद्रे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष किसन किंद्रे, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रामचंद्र पवार यांच्यासह मान्यवर व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी सूर्यकांत किंद्रे यांनी शाळेसाठी आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. किसन किंद्रे यांनी माजी विद्यार्थ्यांना गावाचे हिरे संबोधत त्यांच्या यशाचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा, असे आवाहन केले.
मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या तेजस किंद्रे, मुंबई कारागृह पोलीसपदी निवड झालेल्या राहुल किंद्रे तसेच आयडॉल शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक हरी महांगरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. गोरक्षनाथ डेरे, विश्वनाथ किंद्रे, नितीन किंद्रे व तेजस किंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले. रामचंद्र पवार यांनी आभार मानले. गटशिक्षणाधिकारी सुजाता देशमाने, शिक्षण विस्तार अधिकारी अंजना वाडकर व केंद्रप्रमुख दोडमिसे यांचे मार्गदर्शन लाभले.




