ताज्या घडामोडी

पोलीस भरतीतील बोगस प्रमाणपत्रांचे रॅकेट विरोधात लढणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू ! अनेक प्रश्न अनुत्तरित


बीड : राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेतील बोगस खेळाडू प्रमाणपत्रांचे रॅकेट उघडकीस आणण्यासाठी लढा देणाऱ्या वैभव चव्हाण या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी (दि. ५) बीड तालुक्यातील इमामपूर शिवारात एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर मारहाणीचे वळ, तर पायावर गंभीर जखमा असल्याचे निदर्शनास आल्याने कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

मूळचा बीडचा असलेला वैभव धाराशिव पोलीस दलाच्या भरतीसाठी प्रयत्नशील होता. मात्र, बोगस खेळाडू प्रमाणपत्राच्या आधारे एका उमेदवाराला नोकरी मिळाल्याने त्याची संधी हुकली होती. त्यानंतर वैभवने या प्रकरणाचा पाठपुरावा करीत कथित प्रमाणपत्र घोटाळ्याचे रॅकेट उघडकीस आणले होते.

Advertisement

दरम्यान, मृत्यूपूर्वी वैभवने मित्राला पाठवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये, ‘कुराश संघटनेचे रॅकेट उघडकीस आणल्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. माझा मृत्यू कोणत्याही पद्धतीने झाला तरी त्याला हीच संघटना जबाबदार असेल,’ असे म्हटल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर तब्बल १२ तास ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या मृत्यूमागील नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!