ताज्या घडामोडी

भोर तालुक्यातील हातवे-केतकावणे येथील पुलावर रात्रीच्या अंधारात बिबट्याचे दर्शन ! कारमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला व्हिडिओ !! वाहनचालकांना सतर्कतेचे आवाहन


नसरापूर : भोर तालुक्यातील गुंजवणी खोऱ्यात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा समोर आला असून, हातवे-केतकावणे पुलावर सोमवारी (दि. २ नोव्हेंबर) रात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या अंधारात पुलावरून मुक्तपणे संचार करणाऱ्या बिबट्याचे चित्रीकरण एका कारचालकाने आपल्या मोबाईलमध्ये केले असून, हा व्हिडिओ सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सात ते आठ वाजण्याच्या सुमारास हातवे-केतकावणे पुलावर बिबट्या आढळून आला. यावेळी या मार्गावरून कारने प्रवास करणाऱ्या नागरिकांना अचानक बिबट्याचे दर्शन झाले. प्रसंगावधान राखत कारचालकाने सुरक्षित अंतरावरून बिबट्याचे चित्रीकरण केले. पुलावर बिबट्या संचार करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

Advertisement

गुंजवणी खोऱ्यात यापूर्वीही अनेकदा बिबट्याचा वावर आढळून आला आहे. त्यातच आता थेट पुलावरच बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. या परिसरात रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार, वाहनचालक तसेच शेतात जाणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रात्रीच्या प्रवासात विशेष खबरदारी घ्या 
हातवे-केतकावणे तसेच गुंजवणी खोऱ्यातील इतर मार्गांवरून रात्री प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. दुचाकीस्वारांनी शक्यतो एकट्याने प्रवास टाळावा, रस्त्याच्या कडेला अंधारात थांबू नये आणि बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करू नये. वनविभागानेही या परिसरातील बिबट्याच्या वावराची दखल घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!