ताज्या घडामोडी

भोर तालुक्यातील मोहरी खुर्दचे सरपंच सागर पांगारकर यांना ‘ग्रामरत्न सरपंच’ पुरस्कार ! अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरव


कापूरहोळ : अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने मोहरी खुर्द (ता. भोर, जि. पुणे) ग्रामपंचायतीचे लोकप्रिय व कार्यक्षम सरपंच सागर पांगारकर यांना त्यांच्या उल्लेखनीय ग्रामविकास कार्यासाठी ‘महाराष्ट्राचे ग्रामरत्न सरपंच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा भव्य पुरस्कार सोहळा क्लाउड मिस्ट रिसॉर्ट, पाचगणी येथे नुकताच संपन्न झाला.

अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटिल व डॉ. रामजी अडकेकर (जॉईंट डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस, महाराष्ट्र शासन, पुणे) यांच्या हस्ते सागर पांगारकर यांना सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

विशेषतः कोरोना काळातील त्यांचे अथक प्रयत्न, गावात राबविलेले सामाजिक उपक्रम व कार्यकाळात राबविलेली महत्त्वाची विकासकामे यामुळे त्यांची या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी निवड झाली. कोरोना महामारीत गावकऱ्यांसाठी घरगुती वैद्यकीय सुविधा, ऑक्सिजन बेड व लसीकरण मोहिम यांसारखी कामे त्यांनी यशस्वी राबवली.

Advertisement

तसेच गावाच्या विकासासाठी रस्ते बांधकाम, पाणीपुरवठा योजना, वृक्षारोपण, आरोग्य सुविधा विस्तार, डिजिटल शाळा उभारणी व स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतागृह बांधकाम यांसारख्या योजना प्रभावीपणे अमलात आणल्या. यामुळे मोहरी खुर्द गावाने विकासाच्या दिशेने मोठी भरारी घेतली असून, ग्रामस्थांमध्ये लोकसहभाग व उत्साह वाढला आहे.

सागर पांगारकर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पुरस्काराने त्यांच्या कार्याला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली असून, इतर सरपंचांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असे ग्रामस्थ म्हणतात.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!