पुणे-पिंपरीत भाजपचा ‘ऑपरेशन लोटस’ ! अजित पवार गटाला माजी महापौर-उपमहापौर-सभापतीचा धक्का
पुणे : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राजकारणात हालचालींना वेग आला आहे. मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात पुणे-पिंपरीतील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वडगाव शेरी आमदार बापुसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे, माजी नगरसेवक विकास दांगट, सायली वांजळे आणि बाळा धनकवडे यांनी भाजपचा झंडा उचलला. हे प्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत झाले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता परत मिळवण्याच्या प्रयत्नातील अजित पवार गटाला भाजपकडून मोठा धक्का बसला. माजी महापौरांचा मुलगा, माजी उपमहापौर, माजी स्थायी समिती सभापतीसह ८ माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
यामध्ये पिंपरीतून संजोग वाघेरे, उषा वाघेरे, प्रभाकर वाघेरे, प्रशांत शितोळे, नवनाथ जगताप, राजू मिसाळ, समीर मासुळकर, रवी लांडगे, जालिंदर शिंदे, अमित गावडे, संजय काटे, मीनल यादव, कुशाग्र कदम, प्रसाद शेट्टी व विनोद नढे यांचा समावेश आहे.
निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काहीना विरोध केलाही, पण तरीही पक्षप्रवेश झाल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे. भाजपला पिंपरीत कमबॅकची संधी मिळाली असून, अजित पवार गटाची चिंता वाढली आहे.




