पंचायत समिती निवडणूक ! क्रांती धुमाळ यांनी लढावे !! कामथडी गणातील कार्यकर्त्यांचा आग्रह
संगमनेर : भोर तालुक्यातील कामथडी पंचायत समिती गणातील महिलांना स्वतःचे अंगभूत कौशल्य आणि कलागुण सादर करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने उद्योग क्षेत्रात नाव कमावलेल्या प्रफुल धुमाळ आणि त्यांची पत्नी क्रांती धुमाळ हे दाम्पत्य गेल्या काही वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम आणि स्पर्धा आयोजित करून महिलांना स्वावलंबनाचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत.
सौ. क्रांती धुमाळ यांनी घेतलेल्या पुढाकारातून कामथडी परिसरात महिलांमध्ये आत्मविश्वास, संघभावना आणि सर्जनशीलतेचा विकास झाला आहे. त्यांनी आयोजित केलेल्या पाककला, रांगोळी, हस्तकला, तसेच महिला उद्योजकता कार्यशाळांना मोठा प्रतिसाद मिळाला. या उपक्रमामुळे महिलांचा सामाजिक सहभाग वाढला असून अनेकांनी लघुउद्योगांकडे वाटचाल सुरू केली आहे
.या पार्श्वभूमीवर स्थानिक कार्यकर्त्यांनी पंचायत समिती निवडणुकीत क्रांती धुमाळ यांनी उमेदवारी द्यावी, असा ठाम आग्रह व्यक्त केला आहे. गावात झालेल्या बैठकीत महिला कार्यकर्त्यांनी त्यांची सामाजिक जाण, लोकाभिमुख कामाची पद्धत आणि सर्वस्तरांशी जोडलेले नाते लक्षात घेऊन त्यांना योग्य उमेदवार म्हणून पुढे आणण्याची मागणी केली.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, क्रांती धुमाळ यांनी कामथडी परिसरात महिलांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवला असून शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या क्षेत्रांमध्येही त्यांनी सक्रिय योगदान दिले आहे.कार्यकर्त्यांनी एकमुखाने म्हटले की, “पंचायत समितीतही अशीच सक्रिय, प्रामाणिक आणि समाजहिताची भावना असलेली व्यक्ती असावी. म्हणूनच क्रांतीताईनी या लढ्यात उतरावे.”सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळख मिळवलेल्या क्रांती धुमाळ यांच्याकडून याबाबत सकारात्मक संकेत मिळण्याची ग्रामस्थांना अपेक्षा आहे.




