काळेवाडी येथे कौटुंबिक वादातून मजुरावर हल्ला
किकवी : मौजे काळेवाडी (ता. भोर) येथे कौटुंबिक वादातून मजुरावर लाकडी काठीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. राजगड पोलिस ठाण्यात याबाबत गु.र.नं. 383/2025 भा.दं.स. कलम BNS 118(1), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी राहुल विजय काळे (वय 34, व्यवसाय मजुरी, रा. काळेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री सुमारे 10 वाजता ते आपल्या शेतात असताना त्यांची बहिण सुजाता जाधव, दिपक जाधव, गोपाळ जाधव आणि उमेश जाधव हे चौघे तेथे आले. त्यांनी फिर्यादीकडे घरात ठेवलेले शेतीचे साहित्य न काढण्याबाबत वाद निर्माण केला. फिर्यादीने त्या सर्वांना “हे घर माझ्या वडिलांचे असून मी तेथे राहतो, तुमचे साहित्य ठेवणार नाही” असे सांगितल्यावर संतप्त होऊन चौघांनी मिळून काठीने त्यांच्यावर हल्ला केला. या मारहाणीमध्ये फिर्यादीच्या डोक्याला, हातांना आणि पाठीला दुखापत झाली आहे.
या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पो.हवा. निकम (ब.नं. 1054) यांनी गुन्हा नोंदवला आहे. तपास पो.हवा. निंबाळकर (ब.नं. 2317) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक गवळी यांनी सांगितले की आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.




