पुणे-सातारा महामार्गावर बीफ वाहतूक प्रकरण उघडकीस ; ड्रायव्हर अटकेत
खेडशिवापूर : दि. 25 ऑक्टोबर (शनिवार) सातारा ते पुणे महामार्गावरील खेडशिवपूर टोल नाक्या जवळ शनिवारी सकाळी पोलिसांनी संशयास्पद बोलेरो पिकअप गाडी अडवून तब्बल 7.25 लाख रुपयांचा माल जप्त केला असून एका संशयितास अटक करण्यात आली आहे. राजगड पोलिस स्टेशनच्या गुनक्र. 384/2025 नुसार दत्तात्रय सोपान सोनवळकर (वय 40, रा. दुधेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) यास पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिस शिपाई अभिजीत छगन इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी आपल्या पांढऱ्या रंगाच्या एम एच 43 सीके 5309 या महिंद्रा बोलेरो पिकअप मधून अंदाजे 1500 किलो वजनाचे आणि 2.25 लाख रुपये किमतीचे गौवंश सदृश्य जनावरांचे मांस बेकायदेशीररीत्या वाहतूक करत होता.
बारामती येथील बीफ मार्केटमधून परवानगीशिवाय मुंबईकडे नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खेडशिवपूर टोलनाक्याजवळ सापळा लावून वाहन ताब्यात घेण्यात आले, वाहनाची किंमत अंदाजे 5 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 325, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 व सुधारित अधिनियम 1995 मधील कलम 5(क), 9(अ) तसेच मोका कलम 86 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास राजगड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. तळपे (बॅज क्र. 2283) करत आहेत.




